मुक्ताईनगर :- पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या वढोदा वनक्षेत्र आई मुक्ताई-भवानी व्याघ्र प्रकल्पातील डोलारखेडा वनपरीमंडळातील सुकळी नियतक्षेत्र कं.नं.५४० लगतच्या शेतात २८रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असून शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी पंडीत शिवाजी धनगर यांचे वनहद्दीलगत शेती असुन शेतात संदिप चौधरी या शेतकऱ्याची बटाईची केळीबाग आहे. सायंकाळी संदिप चौधरी भावासह शेतात गेले असता बागेत एक पट्टेदार वाघ बसलेल्या अवस्थेत आढळुन आला. आतापर्यत फक्त पाऊलखुणाच नजरेत पडत होत्या मात्र आज प्रत्यक्ष समोरासमोर अवघ्या पंधरा फुटावरच वाघ बसलेला बघुन त्यांची भाबेरी उडाली. कसेतरी तेथुन निसटुन त्यांनी लागलीच वनकर्मचाऱ्यांना ही माहीती दिली. प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी ऐ.आर.बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.टी.पाटील, वनरक्षक जी.बी. गोसावी, वनमजुर सिद्धार्थ थाटे यांच्यासह विनोद बेलदार, विनोद भोई आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन अवघ्या पंधरा फुटावरुन वाघाचे समोरा-समोर दर्शन घेत सुखद अनुभव घेतला.
दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते गोपाळ सोनवणे यांना सुद्धा दर्शनलाभ मिळाला. काहींनी मोबाईल द्वारे फोटोही काढले आणि बसलेल्या वाघानेही पोज दिली. तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे उकाडा वाढल्याने असह्य उकाड्यापासून सरंक्षणार्थ मांसभक्षी वन्यप्राणी परीसरातील केळी बागांत आसरा घेत आहे. मात्र वाघांच्या वास्तव्यामुळे शेतमजूर शेतात काम करण्यास धजावत नसुन शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतकरी हित लक्षात घेऊन वनविभागाने एक प्रशिक्षित टिम नेमुन द्यावी व शेतकरी यांना याबाबतीत सहकार्य करावे अशी मागणी समोर येत आहे. चार वर्षापुर्वी परीसरातील डोलारखेडा येथील शेतकऱ्याचा बळी वाघाने घेतला होता. यामुळे वनहद्दीलगतच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परीसरात एकापेक्षा जास्त वाघ असुन चार वर्षापुर्वी सुकळी शिवारातील केळीबागेत एक वयोवृध्द वाघिणीचा मृत्यु झाला होता.
आठ-दहा वाघांचा मुक्त संचार असुन अधिवास कायम आहे. हे जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. संवेदनशील भागात वनपरीक्षेत्र अधिकारी नसुन प्रभारी वनाधिकारी यांच्याकडे पदभार देऊन वनविभाग एकप्रकारे दुर्लक्षच करीत आहे. गत सुमारे आठ-दहा महिन्यांपासुन जिल्ह्याचे वैभव असलेल्या वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल नसुन प्रभारी कार्यभार आहे. वनविभागाने एक अनुभवी कर्तव्यदक्ष वनक्षेत्रपाल या व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी नेमावे अशी मागणी स्थानिक लोकांची आहे. मात्र वनविभाग याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तसेच यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज असुन लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करुन किमान एक कर्तव्यदक्ष अधिकारी तरी मिळवुन द्यावा अशी मागणी स्थानिकांची आहे.