मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा बेचाळीसावा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना २० धावांनी जिंकला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
लखनौ सुपर जायंट्सकडून क्विंटन डी कॉकने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३७ चेंडूंत ४६ धावा काढल्या. त्याला संदीप शर्माने बाद केले. दीपक हुडाला जॉनी ब्रेस्ट्रोने ३४ धावांवर धावचीत केले. दुष्मंथा चमिराला १७ धावांवर कगिसो रबाडाने बाद केले. २०व्या षटकाच्या अखेरीस लखनौचा संघ १५३/८ असा तंबूमध्ये परतला होता. कगिसो रबाडाने ४-०-३८-४, राहुल चहरने ४-०-३०-२, संदीप शर्माने ४-०-१८-१ यांनी गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्सकडून जॉनी ब्रेस्ट्रोने ५ चौकारांच्या सहाय्याने ३२ धावा काढल्या. त्याला दुष्मंथा चमिराने बाद केले. कर्णधार मयंक अगरवालने प्रत्येकी २ चौकार आणि षटकार यांच्या सहाय्याने २५ धावा काढल्या. त्याला लखनौच्या कर्णधार के. एल. राहुलने दुष्मंथा चमिराच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. ऋषी धवनने बिनबाद २१ धावा काढल्या. २०व्या षटकात त्याने पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण पुढच्या ४ चेंडूंवर त्याला एकही धाव काढता आली नाही. लिआम लिव्हिंगस्टोनला १८ धावांवर मोहसीन खानने बाद केले. मोहसीन खानने ४-१-२४-३, कृणाल पांड्याने ४-१-११-२, दुष्मंथा चमिराने ४-०-१७-२, रवी बिष्णोईने ४-०-४१-१ यांनी कमी धावसंख्या असताना कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक दिलं. त्यामुळेच लखनौचा संघ २० धावांनी जिंकू शकला.
कृणाल पांड्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ४-१-११-२ गडी बाद केले होते.
उद्याचा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुजरातचा संघ हा सामना जिंकून गुणतक्त्यातलं आपलं पहिलं स्थान अजून भक्कम करण्याचा प्रयत्न करेल तर बेंगळुरूचा संघ चौथं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करेल.