”देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून ट्विट डिलीट केले.नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही” – अमृता फडणवीस

Spread the love

मुंबई :- गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, त्यासोबतच ऑनलाईन देखील हा कलगीतुरा सुरू असतो. यासोबतच नेतेमंडळींना विरुद्ध विचारसरणीच्या मंडळींकडून ट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. यामध्ये चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अमृता फडणवीस. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून अमृता फडणवीस देखील राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्या असून त्यांच्या ट्वीट्सची देखील मोठी चर्चा पाहायला मिळते. याचसंदर्भात एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांना ट्रोलिंगमुळे होतं दु:ख

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ट्रोलिंगमुळे कधीकधी आपल्याला दु:ख होत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “मी जेव्हा ट्रोलिंग बघतो, तेव्हा मला कधीकधी दु:ख होतं. पण तिला (अमृता फडणवीस) वाटत नाही. ती घाबरत नाही. मला कधीकधी सांगावं लागतं की फार झालं आता. तिची सगळी मतं मला पटत नाहीत. माझी अपेक्षा असते की तिने राजकीय ट्वीट करू नयेत. पण शेवटी तिची मतं तिची आहेत. त्यासाठी तिला कधीतरी ट्रोलिंग सहन करावं लागतं. मला दुख तेव्हा होतं की माहितीतली मंडळी असतात. शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ट्रोलिंग करत असतात. ती मंडळी घाणेरडे चेहरे लावून ट्वीट करतात. तेव्हा वाटतं आपण कुठे चाललो आहोत?” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“मी अमृताला अनेकदा म्हणतो की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर अशा गोष्टींचा सराव व्हायला हवा. पण बहुतेक तिला जास्त सराव आहे, मला कमी सराव आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.

“…नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

दरम्यान, याविषयी बोलताना अमृता फडणवीसांनी मात्र रोखठोक भूमिका मांडली. “मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मामी म्हटल्यावर काय वाटतं, अशी विचारणा केली असता “मला मजाच वाटते. कधी थोडं लो वाटलं, तर ट्रोल्स पाहून घ्यायचे, मीम्स पाहून घ्यायचे. फार छान वाटतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ट्रोलर्सला दिले धन्यवाद!

यावेळी अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला खोचकपणे बोलताना धन्यवाद दिले आहेत. तसेच, आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सला नक्की धन्यवाद देईन की त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझ्या स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी असेच स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन आणि तुम्ही असेच ट्रोल करत राहा अशी विनंती करेन”, असं त्या म्हणाल्या.

टीम झुंजार