टाटा आयपीएल – चेन्नईने १३ धावांनी सामना जिंकला

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पुण्याच्या. एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्सने १३ धावांनी हा सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्व्हे यांनी या मोसमातील सर्वोच्च भागीदारी रचली. पहिल्या जोडीसाठी त्यांनी १८२ धावा काढल्या. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ५७ चेंडूंत ९९ धावा काढल्या. त्याला नटराजने शतकासाठी १ धाव हवी असताना बाद केले. डेव्हन कॉन्व्हेने ८ चौकार आणि ५ षटकार यांच्या सहाय्याने ५५ चेंडूंत बिनबाद ८५ धावा काढल्या. कर्णधार एम. एस. धोनीला ८ धावांवर नटराजने बाद केले. चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांच्या अखेरीस २०२/२ अशी विशाल धावसंख्या रचली. नटराजने ४२/२ गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादकडून यष्टिरक्षक निकोलस पुरणने ३ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत बिनबाद ६४ धावा काढल्या. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. कर्णधार केन विल्यमसनने ४७ धावा काढल्या. त्याला ड्वेन प्रिटोरियसने पायचीत टिपले. अभिषेक शर्माला ३९ धावांवर मुकेश चौधरीने बाद केले. ऐडन मार्करामला १७ धावांवर मिशेल सेंटनरने बाद केले. शशांक सिंगला १५ धावांवर मुकेश चौधरीने बाद केले. २०व्या षटकाच्या अखेरीस सनरायझर्स हैदराबादचा संघ १८९/६ इतकीच मजल मारू शकला. मुकेश चौधरीने ४६/४, मिशेल सेंटनरने ३६/१, ड्वेन प्रिटोरियसने ४०/१ यांनी गडी बाद केले. चेन्नईने हैदराबादच्या पुढच्या प्रवासासाठी ह्या विजयाने अडचण निर्माण केली.

ऋतुराज गायकवाडला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने महत्त्वपूर्ण ९९ धावांचे योगदान दिले होते.
उद्याचा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

टीम झुंजार