प्रतिभा पाटील यांना आदर्श सामाजिक कार्यकर्त्यां पुरस्कार….

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी रावेर
रावेर :-
साधारणपणे सात वर्षांपूर्वी 31 डिसेंबर 2015 या दिवशी शिंदखेडा ता रावेर येथील महिला मंडळीने एकत्र येऊन ‘सरस्वती बहुउद्देशीय महिला मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. डिसेंबर महिन्याच्या म्हणजे वर्षाच्या अखेरच्या दिवशी संस्थेची स्थापना करण्याचा उद्देशही आगळा वेगळा होता. वर्षा अखेरचा दिवस म्हटला की, पुरुष वर्ग आणि युवापिढी मोठ्या संख्येने मद्यपान करतात, पार्ट्या करतात आणि याचा सर्वाधिक त्रास कुटुंबातील महिलांना होतो. शिंदखेडा गावात देखील दारू पिणे हा प्रकार खूप वाढला होता. त्यात प्रथम माझ्या म्हणजे प्रतिभा पाटील यांच्या संसाराला त्याचा चटका लागला होता. त्यांचे पती मद्यपान करीत. दारू विकणारा त्यांना उधार द्यायचा आणि शेतीचा हंगाम आल्यावर धान्याच्या पैशातून दारूचे पैसे कापून त्यांना तो पैसे द्यायचा. हे बऱ्याच वर्षापासून चालले होते.

गावात प्रत्येकाकडे घरी भांडण चालायचे.त्यामुळे गावात अनेकांचे संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली होती. शेवटी प्रतिभा पाटील यांनीच पुढाकार घेतला आणि हळूहळू महिलांना गोळा करून त्यांना संघटित करत त्यांना धीर देत त्यांची मानसिकता बदलली. मग गावातील सर्व महिला मिळून त्यांनी ग्रामपंचायत आणि पोलिस ठाण्यांमध्ये 18 सप्टेंबर 2015 ला एक अर्ज दिला. त्यात गावातील दारू विक्री बंद करण्यात यश मिळाले. या यशामुळे आपण सर्व महिलांना एकत्र करून एक महिला मंडळ स्थापन करावे अशी सूचना प्रतिभा पाटील यांनी मांडली.लगेच २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी गावात स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने गावातील सरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी आमच्या कार्यक्रमात सहभागी झाली. एडवोकेट तुषार महाजन यांच्या मार्गदर्शनाने आम्ही 31 डिसेंबर 2015 ला सरस्वती बहुउद्देशीय महिला मंडळ, शिंदखेडा, ही संस्था स्थापन केली.

2016 च्या डिसेंबर महिन्यात आम्ही आरोग्य शिबीर घेतले. डॉ संदीप पाटील, डॉ रवींद्र वानखेडे यांनी गावातील महिलांना तपासून औषधोपचार केले. नंतर पुन्हा 15 मे रोजी जळगाव येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ अनिल पाटील, डॉ संदीप पाटील, डॉ रवींद्र वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक काळेसाहेब, पद्माकर भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर घेतले.त्यात पोटाचे विकार, मूतखडा व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. चार किडनी स्टोनचे, दोन हृदयविकाराचे आणि एक कॅन्सरचा असे सात गंभीर आजाराचे रुग्ण या शिबिरात सापडले. चार रुग्णांच्या किडनी स्टोनचे ऑपरेशन जळगाव येथे सरकारी योजनेतून केले तसेच बायपास आणि कॅन्सरचे देखील ऑपरेशन शासकीय योजनेतून जळगाव येथे झाले.

20 ऑक्टोबर 2016 नवरात्रीच्या काळात नऊ दिवस विविध विषयावर व्याख्याने आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. बेटी बचाव बेटी पढाव हा विषय रांगोळीच्या स्पर्धकांना देण्यात आला होता.बचत गटाची स्थापना करण्याचा विचार करून आम्ही सरस्वती महिला बचत गट स्थापन केला. विविध सरकारी योजना गावात आणल्या. घरकुल, संडास, हागणदारी मुक्त योजना,झाडे लावा- झाडे जगवा, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिलांना मानधन अशी पण काम या माध्यमातून केली. महिलांचाही कृषी गट देखील स्थापन केला. प्रगती महिला कृषी गट असे त्याचे नाव दिले. आम्ही गावात दर वर्षी हनुमान जयंतीला रक्तदान शिबिर आयोजित करतो. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देखील आमच्या गावात संपन्न झाले. गावात महिलांचे १० कृषी गट स्थापन केले असून विविध सरकारी योजनांचा लाभ महिलांना देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व थोर महापुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे, वृक्षारोपण करणे, गावातील समस्या आणि भांडणे सोडवणे, शांतता कायम करणे, वाद मिटवणे या सर्व गोष्टींची आणि समाज कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी या संस्थेने दखल घेऊन वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप नेशनल अवार्ड 2019 व डॉ बाबासाहेब आंबेडकर – फुले हॅलो शिप नॅशनल अवॉर्ड 2019 तसेच आरोग्यदूत हे पुरस्कार आमच्या संस्थेला त्या अकादमीचे अध्यक्ष डॉ सोहन पाल यांच्या हस्ते देण्यात आले. अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांनी आमच्या गावात वेळोवेळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून आम्हाला मदत केली आहे. सरकारी योजना राबवण्यासाठी श्री महेंद्र वाघ,अंकुष जोशी, सचिन गायकवाड, चंद्रकांत माळी हे कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आम्हाला मदत करतात. पंचायत समिती मार्फत पारस बाग तयार करणे, निराधार महिलांना पारसबागेतील भाजीपाला वाटप करणे,मोफत रक्तगट तपासणी शिबीर घेणे इत्यादी उपक्रमांचे आयोजन आमची संस्था करते. कुपोषित आणि गरोदर महिला यांना भाजीपाला पुरवण्याचे कामही आमची संस्था करत असते. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला शैलेंद्र देशमुख, अरुण पाटील, अँड तुषार महाजन हे मदत करतात.आमच्या संस्थेच्या माध्यमातून मास्क वाटप करणे, टायगरच्या वाटप करणे, भजनी उपक्रमात सहभागी होणे अशा कामाची दखल खासदार रक्षाताई खडसे, तात्कालीन आमदार हरिभाऊ जावळे, मा मंत्री श्री सुनील तटकरे, चित्राताई वाघ या सर्व मान्यवरांनी घेऊन आमच्या संस्थेचा विविध प्रसंगी सत्कार करण्यात आलेला आहे. मा श्री एकनाथराव खडसे, मा श्री अजित दादा पवार तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी देखील कार्याची दखल घेऊन आमच्या संस्थेचा सत्कार करून आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन केलेले आहे. याच लोकाभिमुख कार्यामुळे प्रतिभा पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांच्या हस्ते आदर्श सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

टीम झुंजार