झुंजार । प्रतिनिधी
धरणगाव :- शहरातील महावीर पार्क शेजारील घरामध्ये सुरू असलेला पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करावा, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन यांनी धरणगाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धरणगाव शहराबाहेरील महावीर पार्क शेजारील घरात सर्रासपणे दिवस रात्र सुरू असलेला पत्त्याचा जुगार एका राजकीय पक्षाच्या दोन ते तीन नगरसेवक मिळून चालवीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जमा करत 40 ते 50 लोकांवर कारवाई केली होती.
दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉलनी परिसरातील ‘त्या’ जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे. पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू,मटण,सिगारेट इत्यादीसह अन्य आमिषे दिले जात असल्याचाही भाजपाचा आरोप आहे. यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम या दोन ते तीन लोकप्रतिनिधी मार्फत सूरु असल्याचा मोठा आरोप देखील भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे हा पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करावा व संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही भाजपने दिला आहे. सदरील निवेदन धरणगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना देण्यात आले. त्याच बरोबर तक्रार अर्जाच्या प्रति पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी चोपडा या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
निवेदन देते वेळी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.