कामठी (जि. नागपूर) : – कामठीच्या मेनरोड स्थित असलेल्या नेत्ररोगतज्ञाकडे डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डंपरसोबत अपघात ( accident) झाला. या अपघातात आजोबा रामदास परसरामजी वनकर (६५) व त्रिशांत राकेश वनकर (वय अडीचे वर्ष) या नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सून दामिनी राकेश वनकर (४५) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी हैदरी चौकालगत असलेल्या रॉय हॉस्पिटलजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामदास वनकर हे सीआरपीएफमधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा राकेश वनकर हा गुवाहाटी, आसाम येथे सैनिक म्हणून नोकरीवर आहे. वनकर कुटुंब गजानननगर, पिपळा फाटा, नागपूर येथे वास्तव्यास आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ते कामठी मेनरोड स्थित नेत्ररोगतज्ञाकडे दुचाकीने हैदरी चौक मार्गे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने भरधाव जात असलेल्या डंपर लगत दुचाकी अनियंत्रित ( accident) झाली.
दुचाकीवर बसलेली सून दामिनी या रस्त्याच्या कडेला पडल्या. तर दुचाकी चालक व नातू टिप्परच्या चाकाखाली आले. यात आजोबा व नातू दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात घडताच डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांनी डंपरवर दगड मारून काचा फोडल्या व ट्रकला थांबविले. नागरिकांनी धाव घेत टिप्पर चालकाची धुलाई करीत पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपीला अटक
पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून तिघांनाही नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी रामदास वनकर व त्रिशांत वनकर यांना मृत घोषित केले. तर दामिनी वनकर यांच्यावर उपचार सुरू आहे. जुनी कामठी पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी टिप्पर चालक जितेंद्र अमरकंठक भोंगाडे (२४, रा सालई (बु.), ता. मोहाडी, जि. भंडारा) याला अटक केली.