टाटा आयपीएल – बेंगळुरूने १३ धावांनी सामना जिंकला

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा एकोणपन्नासावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १३ धावांनी हा सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून महिपाल लोमरोरने ३ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ४२ धावा काढल्या. त्याला महेश ठीकशानाने बाद केले. कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३८ धावा काढल्या. त्याला मोईन अलीने बाद केले.

विराट कोहलीने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ३० धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा मोईन अलीने उध्वस्त केला. रजत पतिदार आणि दिनेश कार्तिकची जोडी चांगल्या धावा जोडत असताना ड्वेन प्रिटोरीयसने रजतला २१ धावांवर बाद केले. दिनेश कार्तिकने १ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने १७ चेंडूंत नाबाद २६ धावा काढल्या. बेंगळुरूने २०व्या षटकाच्या अखेरीस १७३/८ असे आव्हान उभे केले. महेश ठीकशानाने २७/३, मोईन अलीने २८/२, ड्वेन प्रिटोरीयसने ४२/१ यांनी गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर डेव्हन कॉन्वेने ६ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३७ चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याला वाणिंदू हसरंगाने बाद केले. मोईन अलीने २ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ३४ धावा काढल्या. त्याला हर्षल पटेलने बाद केले. ऋतुराज गायकवाडने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २३ चेंडूंत २८ धावा काढल्या. त्याला शाहबाझ अहमदने बाद केले. ड्वेन प्रिटोरीयसला १३ धावांवर हर्षल पटेलने बाद केले. बाकी सहा फलंदाजांनी एकत्रित २५ धावा काढल्या. त्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी कर्णधार रवींद्र जडेजा, रॉबिन उतप्पा, अंबाती रायडू यांचा समावेश होता. त्यामुळेच चेन्नई केवळ १६०/८ इतकीच मजल गाठू शकले. हर्षल पटेलने ३५/३, ग्लेन मॅक्सवेलने २२/२ आणि शाहबाझ अहमद, वाणिंदू हसरंगा, जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १३ धावांनी हा सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुणतक्त्यामध्ये चौथ्या स्थानावर पकड मजबूत केली.

हर्षल पटेलला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ३५ धावांत महत्त्वपूर्ण ३ गडी बाद केले होते.
उद्याचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकून गुणतक्त्यात दबाव निर्माण करू शकतात.

टीम झुंजार