नवी दिल्ली : बिहार, झारखंडमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान ईडीने वरिष्ठ आयएएस आणि झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दोन डझन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. छाप्यादरम्यान पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या सनदी लेखापालकडून १९ कोटी ३१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सिंघल यांच्या घरातून कोट्यवधींचे घबाड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ईडिला या छाप्यात विविध ठिकाणांहून १५० कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. मात्र, ईडीने अद्याप यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरुच होती, असे सांगण्यात आले आहे. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सनदी लेखापाल सुमन कुमार यांच्या बुटी हनुमाननगर येथील सोनाली अपार्टमेंटमधून जप्त करण्यात आलेल्या १९.३१ कोटींहून अधिक रोख रकमेची माहिती ईडी गोळा करत आहे. त्याचबरोबर ईडीचे अधिकारी गुंतवणुकीची कागदपत्रेही तपासत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला.
ईडीच्या पथकाने पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. रांची, मुंबई, दिल्ली आणि जयपूर येथे हे छापे टाकण्यात आले. ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली रांचीमधील छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी पूजा सिंघल यांचे रांची येथील अधिकृत निवासस्थान, कानके रोडवरील पंचवटी रेसिडेन्सीच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक १०४, सीए सुमन कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थान, पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर यांच्यावर छापे टाकले. झा यांचे मुझफ्फरपूर, मिठनपुरा येथील निवासस्थान, पूजा सिंघल यांचा भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांच्या कोलकात्यात, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांच्या जयपूर येथील निवासस्थानासह एकूण दोन डझन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
२००० बॅचच्या आयएएस पूजा सिंघल यांची खुंटी आणि चतरा येथील मनरेगा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. मनरेगा घोटाळ्याप्रकरणी ईडीने यापूर्वी कनिष्ठ अभियंता रामविनोद सिन्हा यांच्यावर कारवाई केली होती. रामविनोद यांच्या चौकशीत समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने पूजा सिंघल यांच्या भूमिकेचा तपास सुरू केला होता. मनरेगा घोटाळा तसेच विविध पदे भूषवून नफा कमावून मनी लाँड्रिंग या बाबींचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.