मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदाा ठाकरे सरकारवर हल्ल्याबोल केला आहे. यावेळी त्यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. “मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा,” असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवले, असंही सांगितलं.
रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले,“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल.”
“दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. मात्र, येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केलीय. ती लंका आम्ही नष्ट करू,” असं म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेनेला आव्हान दिलं. “मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईला न्याय देण्यासाठी, चांगला विकास व्हावा यासाठी आणि भ्रष्टाचाराची लंका संपवण्यासाठी मी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचाराला उतरेल. जे रामभक्त आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना पाठिंबा देईल,” असे ठामपणे यावेळी नवनीत राणा यांनी म्हटले.
तसेच नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “क्रुरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणं गरजेचं असल्याचं लिहून दिलं तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझं मानसिक शोषण झालं. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी आहेत.”