टाटा आयपीएल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ६७ धावांनी विजयी

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ६७ धावांनी हा सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सर्वाधिक धावा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने काढल्या. त्याने ८ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ५० चेंडूंत नाबाद ७३ धावा काढल्या. रजत पाटिदारने ४ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३८ चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्याला अर्धशतक पासून जगदीश सुचितने वंचित ठेवलं. ग्लेन मॅक्सवेलने ३ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ३३ धावा काढल्या. त्याला कार्तिक त्यागीने बाद केले.

यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने एक वादळ आणलं होतं. तो तंबूतूनच पूर्ण तयार होऊन आला होता. त्याने १ चौकार आणि ४ षटकार यांच्या सहाय्याने ८ चेंडूंत नाबाद ३० धावा काढल्या. त्यामुळे बेंगळुरू १९२/३ अशी दमदार धावसंख्या उभारू शकले. जगदीश सुचितने ३०/२, कार्तिक त्यागीने ४०/१ गडी बाद केले. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊनही मुख्य फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची धावसंख्या पाहूनच अवस्था वाईट झाली. त्यांच्या कर्णधारासह ४ फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. राहुल त्रिपाठीने एकाकी झुंज देत ५८ धावा काढल्या. त्याला जोश हेझलवूडने बाद केलं. ऐडन मार्करामला २१ धावांवर आणि यष्टिरक्षक निकोलस पुरणला १९ धावांवर वाणींदू हसरंगाने बाद केलं. इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्याही जोडता आली नाही. त्यामुळे हैदराबादचा संपूर्ण संघ १९.२ षटकांमध्ये १२५ धावा काढून तंबूत परतला.

बेंगळुरूने ७ गोलंदाज वापरले. वाणींदू हसरंगाने ४-१-१८-५ ह्या मोसमातील पहिले पंचक मिळवले. तर जोश हेझलवूडने १७/२, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा सामना ६७ धावांनी जिंकला आणि गुणतक्त्यातलं आपलं चौथं स्थान राखलं.
वाणींदू हसरंगाला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने १८ धावांमध्ये ५ गडी बाद केले होते.

टीम झुंजार