टाटा आयपीएल – कोलकाता क्नाईट रायडर्सचा ५२ धावांनी विजय

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा छप्पनवा सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध कोलकाता क्नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. कोलकाता क्नाईट रायडर्सने ५२ धावांनी हा सामना जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकाता क्नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी सलामी दिली.

व्यंकटेश अय्यरने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याला कुमार कार्तिकेयने बाद केले. अजिंक्य रहाणेला २५ धावांवर कुमार कार्तिकेयने बाद केले. नितीश राणाने
३ चौकार आणि ४ षटकार यांच्या सहाय्याने २६ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. रिंकू सिंगने २ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १९ चेंडूंत नाबाद २३ धावा काढल्या. इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्याही जोडता आली नाही. त्यामुळे कोलकाता क्नाईट रायडर्सने १६५/९ अशी धावसंख्या उभी केली. जसप्रीत बुमराहने ४-१-१०-५, कुमार कार्तिकेयने ३५/२, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडिअन्सकडून यष्टिरक्षक ईशान किशनने ५ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ४३ चेंडूंत ५१ धावा काढल्या. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. किरॉन पोलार्डला १५ धावांवर वरुण चक्रवर्तीने धावचीत केले. टीम डेव्हिडला १३ धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद केले. रमणदीप सिंगला १२ धावांवर आंद्रे रसेलने बाद केले. इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्याही जोडता आली नाही.

त्यामुळे मुंबई इंडिअन्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत ११३ धावांवर परतला आणि कोलकाता क्नाईट रायडर्सने ५२ धावांनी हा सामना जिंकला. पॅट कमिन्सने २२/३, आंद्रे रसेलने २२/२, टीम साऊदी, वरुण चक्रवर्तीने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. वाईटात चांगली गोष्ट म्हणजे मुंबईच्या जसप्रीत बुमराहला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याचे गोलंदाजी पृथक्करण ४-१-१०-५ असे होते.

उद्याचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे. गुणतक्त्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी चढाओढ उद्याच्या सामन्यात दिसेल.

टीम झुंजार