मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्सने ९१ धावांनी हा सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वे यांनी ह्या मोसमातली पहिली शतकी सलामी दिली. ऋतुराज गायकवाडने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ४१ धावा काढल्या. त्याला एनरिच नोर्टजेने बाद केले.
डेव्हन कॉन्वेने ७ चौकार आणि ५ षटकार यांच्या सहाय्याने ४९ चेंडूंत ८७ धावा काढल्या. त्याला खलील अहमदने बाद केले. शिवम दुबेने प्रत्येकी २ चौकार आणि षटकार यांच्या सहाय्याने १९ चेंडूंत ३२ धावा काढल्या. त्याला मिशेल मार्शने बाद केले. कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंदसिंग धोनीने १ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ८ चेंडूंत नाबाद २१ धावा काढल्या. चेन्नईने २०८/६ असा धावांचा डोंगर उभा केला. एनरिच नोर्टजेने ४२/३, खलील अहमदने २८/२, मिशेल मार्शने ३४/१ यांनी गडी बाद केले.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची धावसंख्या पाहूनच अवस्था वाईट झाली. मिशेल मार्शला २५ धावांवर मोईन अलीने बाद केले. ड्वेन ब्राव्होने शार्दुल ठाकूरला २४ धावांवर बाद केले. कर्णधार आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतचा त्रिफाळा २१ धावांवर मोईन अलीने उध्वस्त केला. डेव्हिड वॉर्नरला १९ धावांवर महेश ठिकशानाने पायचीत टिपले. इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्याही जोडता आली नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स अवघ्या ११७ धावा काढून सर्वबाद झाले. ह्या मोसमातील दिल्लीचा हा लाजिरवाणा पराभव ठरला.
मोईन अलीने १३/३, मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो, समरजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. तर महेश ठिकशानाने एक गडी बाद केला. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीवर चेन्नई सुपर किंग्सने हा सामना ९१ धावांनी जिंकला आणि गुणतक्त्यात आठव्या स्थानावर झेप घेतली. दिल्ली कॅपिटल्स पराभवानंतरही पाचव्या स्थानावर कायम आहे.
डेव्हन कॉन्वेला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ४९ चेंडूंत ८७ धावा काढल्या होत्या.
उद्याचा सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध कोलकाता क्नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. मुंबई सलग दोन सामने जिंकून जोषात आहे तर कोलकाता परतीच्या सामन्यातही विजयासाठी प्रयत्न करतील.