शिरपूर : होय लेखात दिलेल्या शिर्षका प्रमाणे सुमित चुणचुणीत आहे. नेहमीच चेहऱ्यावर हास्य असणारा सुनिल साधारणपणे दोन महिन्यापूर्वी मला भेटला होता. भेटही अशीच अचानक होती. मित्राच्या दुकानात कामानिमित्ताने बसलो होतो. मित्राने चहाचा आग्रह केला नाही नाही म्हणत दोन मध्ये तीन कटींग चहा घेऊया असे ठरले व चहाची आज्ञा दिली. मित्रासोबत गप्पा करण्यात मी तल्लीन झालो. पुढच्या पाच मिनिटात आमच्या समोर साधारण बारा-तेरा वर्षांचा एक गोंडस मुलगा खांद्यावर टेबल पुसायचा रूमाल टाकून हातात चहाचे कप असलेला ट्रे घेऊन हजर झाला. मी ते गोंडस रूपडं वर पासून खालपर्यंत न्याहळत होतो. हाफ चड्डीत असलेल्या त्या चहावाल्या पोराच्या “सरजी, तीन हाफ कटींग चहा” या शब्दाने मी भानावर आलो. मित्रासोबत चहा घेतांनाच या चहावाल्या पोराशी गप्पा सुरू झाल्या.
हो हाच तो चुणचुणीत सुमित पावरा ज्याच्या संदर्भात आज लेख लिहण्याची इच्छा झाली. सुमित सोबत गप्पा मारतांना समजले आमच्या शिरपूर तालुक्यातील एका पाड्यावर राहणारे सुनिल चे कुटुंब गावात कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी शिरपूर शहरात आले आहेत. वडील एका बांधकामावर रखवालदारी करतात तर आई तीन – चार चिल्लीपिल्ली सांभाळून मोल मजूरी करते.
गप्पा करतांना सुनिल कडून काही गोष्टी समजल्या तो म्हणाला, सर माझ्या कुटुंबात मी मोठा भाऊ आहे. मोठा असल्याने आई व वडिलांना मदत व्हावी म्हणून मी गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात शाळा बंद असल्याने हाॅटेल व चहाच्या टपरीवर जेथे मिळेल तेथे मजूरी करून वडिलांना मदत करतोय.
क्षणभर वाटलं उठावं आणि सॅल्युट करावं या चहावाल्या पोराला. किती विषमता आहे आपल्या देशात एक चहावाला देशाचे पंतप्रधान झालेत व एक चहावाला पोऱ्या वडिलांना मदत व्हावी म्हणून धडपडतोय खरचं मनापासून सॅल्युट या दोन्ही चहावाल्यांना!
माझ्या मुलाच्या वयाचा सुनिल चहा वाटप करुन कुटुंबाला हातभार लावतो ही खूपच अभिमानाची गोष्ट असली तरीही सुमितचं भविष्याचे काय हा विचार येताच माझ्यातील शिक्षक ( हाडाचा शिक्षक म्हणूनच नका शिक्षकांना शिकविणे व्यतिरिक्त अशैक्षणिक कामे उदा. खावटी वाटप, जणगणना, भिल कुटुंब, पारधी कुटुंब सर्वे अशी अनेक कामे देऊन सर्व हाडे मोडून टाकली आहेत हो हाडाचे शिक्षक न म्हणता बोनलेस म्हटल्यास वावगे ठरणार नाही पण ते तुम्ही ठरवा) जागा झाला.
सुमित मधे-मधे चहा देण्याच्या निमित्ताने भेटत राहिला त्याच्या गोंडस रूपड्यामुळे व गोड बोलण्यामुळे माझी सुमितसोबत गट्टी जमली. सुमित मोकळेपणाने बोलू लागला हिंदी मिश्रीत पावरा भाषा बोलणाऱ्या सुमित सोबत मी एकदा अस्सल पावरा भाषेत संवाद साधला तर त्याला प्रचंड हासू आलं व कुणीतरी आपल्या जवळचा जातभाई भेटल्या चा आनंद सुमितला झाला.
सुमित ने उच्च शिक्षण घ्यावे खूपच मोठ्ठा व चांगला माणूस बनावं हीच त्याच्या आई वडिलांची व मित्रवर्य शिक्षक म्हणून माझी इच्छा आहे.
सुमित सध्या सातव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. शिक्षण घेतांना मजूरी करावी लागू नये ही माझी तीव्र इच्छा आहे. पण परिस्थिती माणसाला मोठ्ठ बनविते म्हणूनच तेरा वर्षांचा सुमित तेविस वर्षाच्या तरुणा सारखा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपडतोय.
सुमित जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा त्याने खूप उच्च शिक्षण घ्यावे यासाठी प्रेरणेचे डोस देतोच पण सोबतच शिक्षणासाठी हवे असणारे शैक्षणिक साहित्य, कपडे काहीही लागल्यास अवश्य माग हे वचन सुमितला केव्हाच दिलं आहे.
सुमित सारख्या असंख्य धडपडणाऱ्या मुलां-मुलींसाठी, तरूण-तरूणींसाठी मदत करता यावी म्हणून माझ्या मित्र – मंडळीच्या सहकार्याने माऊली सेवा संस्था, शिरपूर येथे सुरू केली असून या संस्थेच्या वतीने सुमितला शिक्षणासाठी काही मदत करता येईल का? याचाही विचार सुरू आहे.
वरील लेख वाचणाऱ्या सर्व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की सुमित चा शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी घेता आल्यास सन २०२२-२३ ते २०२८-२९ अशी सहा वर्षे (सातवी ते बारावी) सुमितची शिक्षणाची वाट सुकर होईल. प्रत्येक शैक्षणिक वर्षांसाठी एक शैक्षणिक वर्ष पालक या संकल्पनेवर आधारित सहा शैक्षणिक पालक आवश्यक आहेत. आमची माऊली सेवा संस्था, शिरपूर माऊली ची सावली या योजने अंतर्गत सुमित चा एका वर्षाचा शैक्षणिक खर्च उचलणार आहे.
आम्ही आता आपल्या दानशूर समाजात नक्कीच पाच वर्षांसाठी पाच शैक्षणिक वर्षांचा खर्च उचलणारे पालक भेटतील या प्रतिक्षेत आहोत.
लेखक – योगेश बेटावदकर
भ्रमणध्वनी ७२४९२२३५१६
९४२०७०३७२०
ईमेल – [email protected]