शेतकऱ्यांना ६ आठवड्यात पीक विम्याची भरपाई द्यावी, न्यायालयाचे आदेश.

Spread the love

उस्मानाबाद :- राज्यात पीक विमा कंपन्यांची मनमानी सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे. सहा आठवड्यात जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर पुढील सहा आठवड्यात ते राज्य सरकारने द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा न करता विमा कंपन्यांवर दबाव आणावा आणि शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवून द्यावे अशी मागणी भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती देण्यासाठी आ.जगजितसिंग राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. आ.राणा म्हणाले म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात जून २०२० मध्ये खूप पाऊस पडला होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पाहणीसाठी आले होते. सर्वांनी मदतीचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्याचे नुकसान झाल्यावर दोन प्रकारची मदत मिळते. एक म्हणजे अनुदान स्वरूपात तर दुसरे म्हणजे पीक विमा. हक्काची मदत म्हणजे पीक विमा असते. २०२० च्या खरिपात उस्मानाबाद जिल्ह्यात ४.५ लाख शेतकऱ्यांनी विम्याचा हफ्ता भरला होता. त्यात केवळ २० टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला. सर्वांना लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला. स्थानिक प्रशासन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही गेलो होतो असे ते म्हणाले.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तात्काळ विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. ठाकरे सरकारने आपली ठाकरेगीरी त्यांच्या समोर दाखवावी, असे आव्हान आ.जगजितसिंग राणा यांनी दिले आहे.

टीम झुंजार