टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सचा ६२ धावांनी विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा सत्तावन्नवा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने ६२ धावांनी हा सामना जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

गुजरात टायटन्सकडून शुभमन गीलने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ७ चौकारांच्या सहाय्याने ४९ चेंडूंत नाबाद ६३ धावा काढल्या. डेव्हिड मिलरला २६ धावांवर जेसन होल्डरने बाद केले. राहुल तेवटीयाने चार चौकारांसह नाबाद २२ धावा काढल्या. कर्णधार हार्दिक पांड्या ११ आणि मॅथ्यू वेड १० यांना आवेश खानने बाद केले. २०व्या षटकाच्या अखेरीस गुजरात टायटन्स १४४/४ अशी किरकोळ धावसंख्या उभारू शकले. आवेश खानने २६/२, मोहसीन खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

लखनौ सुपर जायंट्स यांची तयारी बघता हा सामना ते सहज जिंकतील अशी त्यांच्या चाहत्यांना आशा होती. पण कमी धावसंख्या असताना गोलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण गुजरात संघाने दिले. दीपक हुडाला २७ धावांवर रशीद खानने बाद केले. आवेश खानने २ षटकारांच्या सहाय्याने १२ धावा काढल्या. त्यालाही रशीद खानने बाद केले. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकला ११ धावांवर यश दयालने बाद केले. लखनौच्या इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्याही जोडता आली नाही. त्यामुळे १३.५ षटकांत संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत परतला होता. ह्या मोसमातला आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव आहे.

गुजरातच्या रशीद खानने २४/४, रवीश्रीनीवासन साई किशोरने ७/२, यश दयालने २४/२, महंमद सामीने ५/१ यांनी गडी बाद केले. टिच्चून मारा कसा केला जातो याचं प्रात्यक्षिक म्हणजे हा सामना होता. गुजतातचा संघ मागच्या दोन पराभवातून शिकला आणि म्हणूनच आज पुन्हा गुणतक्त्यात प्रथम क्रमांकावर विराजमान झाला.
शुभमन गीलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने नाबाद ६३ धावा काढल्या होत्या.

उद्याचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. गुणतक्त्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी चढाओढ उद्याच्या सामन्यात दिसेल. राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून दुसर्‍या क्रमांकावर झेप घेण्याचा प्रयत्न करेल. पण त्यांना धावगती वाढवण्याची गरज आहे. त्याचवेळी दिल्ली देखील हा सामना जिंकून आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील.

टीम झुंजार