जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी चार पोलीस कर्मचारी निलंबीत

Spread the love

जळगाव :- जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या कैद्यांमध्ये रविवारी रात्री हाणामारी झाली होती. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. बंदी रुग्ण कक्षात कैद्यांना मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मुभा देणे चार पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. घटनेस जबाबदार तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबित केले आहे.

निलंबित केलेले कर्मचारी.

निलंबीत केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पंडीतराव ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल पारस नरेंद्र बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल किरण अशोक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पुरुषोत्तम कोळी यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?

खुनाच्या गुन्ह्यातील दशरथ बुधा महाजन रा.एरंडोल, सतीश मिलिंद गायकवाड रा. आंबेडकर नगर, जळगाव यांच्यासह पाच कैदी जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात दाखल झाले होते. रविवारी रात्री यापैकी दशरथ महाजन व सतीश गायकवाड दोन कैद्यांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे.


भांडण करणाऱ्या कैद्यांना शांत करण्यासाठी त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजेश कोळी हे चावीने दरवाजा उघडून आत गेले. त्यावेळी आरोपी सतिष गायकवाड याने पोलिस कर्मचारी राजेश कोळी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. ‘तु आमच्या वादात पडू नको नाहीतर चाकूने तुझा मर्डर करुन टाकेन’, अशी धमकी सतीष गायकवाड याने दिली होती. तसेच कर्मचाऱ्याला लोटून दिले होते. वाद वाढल्याने बाहेरील देखील काही तरुण आल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भितीने रुग्ण तसेच कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत सुटले होते.

सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी चौकशी केली. रुग्णालयाच्या कैदी वॉर्डाबाहेरील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सोमवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे फुटेज स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी पाहिले. त्यात कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला. न्यायालयीन बंद्यांना गैरप्रकार करण्यासाठी पोलिस सूट देत असल्याचे दिसून आले. कैदी वॉर्डातून बंदी असलेले संशयित विनाकारण बाहेर फिरतात, कुटंुबीय थेट त्यांना भेटतात, घरून जेवणाचा डबा आणला जातो, दारू पिण्याचे व्हिडिओ चित्रित होऊ नये म्हणून वॉर्डातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून ठेवला आहे. अशा अनेक गंभीर बाबी सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाल्या. चौकशीअंती डॉ. मुंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवत चाैघा पाेलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेची पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गांभिर्याने दखल घेतली तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस कर्मचारी सतीश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी जिल्हापेठ पोलिसात कैदी सतिष मिलींद गायकवाड व त्याचे इतर मित्र आणि इतर नातेवाईकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह इतर मुभा दिल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात घटनेच्या दिवशी कर्तव्य बजावणारे चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नियुक्त केले आहे.

टीम झुंजार