काळजी घ्या ! जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 47.2 अंश तापमानाची नोंद

Spread the love

जळगाव : राज्यातील अनेक भागात तापमानाचा कहर पाहायला मिळतोय. जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे यंदाच्या मोसमातील 47.2 इतक्या उच्च तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे जळगावकर चांगेलच हैराण झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 मेपर्यंत राज्यात उष्णतेची ही लाट कायम राहणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 मे रोजी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असून 10 ते 12 मे दरम्यान विदर्भात देखील उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पाहायला मिळत असून जिल्ह्यातील केळी बागांना उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी तापमान जास्तच असते. परंतु, गेल्या काही वर्षात जळगावातील तापमान 46 अंशाच्या वर गेले नव्हते. या वर्षी मात्र 47.2 अंशसेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

यामुळे वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. ज्यांना घराबाहेर पडणे गरजचे आहे असे नागरिक डोक्याला आणि कानाला कापड बाधून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी पोटभर पाणी पिण्यासह ऊन्हापासून संरक्षण करण्याच्या साधनांचा वापर करूनच घराबाहेर पडावे, असं आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टीम झुंजार