मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा अठ्ठावन्नवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने ८ गडी आणि ११ चेंडू राखून हा सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. राजस्थान रॉयल्सकडून रवीचंद्रन अश्विनने अर्धशतक झळकावले. त्याला मिशेल मार्शने बाद केले. देवदत्त पडीक्कलने ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३० चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्याला एनरिच नॉर्टजेने बाद केले.
यशस्वी जयस्वालला १९ धावांवर मिशेल मार्शने बाद केले. रेसी वॅन डर दुस्सेन १२ धावा काढून नाबाद राहिला. २०व्या षटका अखेरीस राजस्थान रॉयल्स १६०/६ अशी धावसंख्या उभारू शकले. चेतन साकारीया, एनरिच नॉर्टजे आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सने पहिला गडी शून्यावर बाद झाल्यानंतर संथ सुरूवात केली. जम बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्शने आपल्या ठेवणीतले फटके दाखवायला सुरूवात केली. दुसर्या जोडीसाठी या दोघांनी १४४ धावा जोडल्या. ह्या मोसमातला हा विक्रम आहे. मिशेल मार्शने ५ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने ६२ चेंडूंत ८९ धावा काढल्या. त्याला यझुवेंद्र चहलने बाद केले.
डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंतने विजयी धावसंख्या पार करून दिल्लीच्या नावावर अजून एक विजय जोडला. डेव्हिड वॉर्नरने ५ चौकार आणि एका षटकारांच्या सहाय्याने ४१ चेंडूंत नाबाद ५२ धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर ३ धावा काढून आपलं अर्धशतक आणि संघाचा विजय साकार केला. कर्णधार यष्टिरक्षक ऋषभ पंतने २ षटकारांच्या सहाय्याने ४ चेंडूंत नाबाद १३ धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्सने १६१/२ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. ट्रेण्ट बोल्ट आणि यझुवेंद्र चहलने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
सामना हरल्यानंतरही राजस्थान रॉयल्स गुणतक्त्यात तिसर्या स्थानावर कायम आहे. अंतिम चारमध्ये पोहचण्यासाठी पुढील सामने अटीतटीचे होणार यात शंका नाही.
मिशेल मार्शला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने गोलंदाजी करताना केवळ ३ षटकांत २५ धावांमध्ये ३ गडी बाद केले आणि फलंदाजी करताना बहुमूल्य ८९ धावा काढल्या होत्या. त्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
उद्याचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडिअन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ तळाला असल्यामुळे ह्या सामन्याच्या निकालाचा इतर संघांवर परिणाम होणार नाही. पण परतीच्या सामन्यात विजय मिळवून मुंबई आपल्या पराभवाचा वचपा काढेल.