चालकाचा ताबा सुटल्याने कार ६० फूट खोल दरीत कोसळली; प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील तीन भावांसह पुतण्या ठार

Spread the love

कडा/आष्टी (जि.बीड) : – अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण असे चौघे जागीच ठार झाले.तर एक वीस वर्षीय मुलगा मात्र बालंबाल बचावला असुन त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड येथून नगरला कामानिमित्त निघालेल्या कुटुंबाची कार ६० फूट खोल दरीत कोसळून चौघे ठार झाले. मृतांत तीन सख्खे भाऊ व एका पुतण्याचा समावेश आहे. अन्य एक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ११ मे रोजी रात्री नगर- बीड मार्गावरील म्हसोबा फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली.

सतीश पंजुमल टेकवाणी (५८), शंकर पंजुमल टेकवाणी (४६), सुनील पंजुमल टेकवाणी (४८, रा. कारंजा परिसर, बीड) व लखन महेश टेकवाणी (२०,रा. सारडा कॅपिटलजवळ, बीड) अशी मयतांची नावे आहेत. नीरज शंकर टेकवाणी (२०) हा जखमी आहे. बुक स्टॉल, हॉटेलींग व्यवसायात असलेले टेकवाणी कुटुंबातील पाच जण कारने (एमएच २३ एएस-४०२५) व्यावसायिक कामासाठी बीडहून नगरकडे जात होते. 

नगर- बीड मार्गावरील म्हसोबा फाटा नजीक घाटात एका वळणावर चालक नीरज टेकवाणीचा ताबा सुटला. त्यामुळे कार ६० फूट खोल दरीत कोसळली. यात सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी व लखन टेकवाणी या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर नीरज टेकवाणी जखमी आहे.

घटनास्थळी अंभोरा ठाण्याचे उपनिरीक्षक रवि देशमाने, पो. ना. प्रल्हाद देवडे, हवालदार लुईस पवार यांनी भेट दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.साेमेश्वर घोडके, डॉ.नितीन मोरे, डॉ.प्रसाद वाघ,डॉ. नितीन राऊत व डॉ. अनिल आरबे यांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले.

टीम झुंजार