टाटा आयपीएल – मुंबईचा पलटवार चेन्नईवर ५ गडी राखून विजय

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा एकोणसाठावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडिअन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबई इंडिअन्सने ५ गडी आणि ३१ चेंडू राखून हा सामना जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

चेन्नई सुपर किंग्सने ह्या मोसमातली दुसरी निचांकी धावसंख्या रचली. चेन्नई सुपर किंग्सकडून कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याने एकाकी लढत दिली. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा काढल्या. डनियल सॅम्सने पहिल्याच षटकात चेन्नईला दोन झटके दिले. त्यातून ते सावरूच शकले नाहीत. पण त्यावेळी वीज वितरणात व्यत्यय आल्यामुळे डेव्हन कॉन्वे याला डीआरएस सुविधा वापरता आली नाही. ड्वेन ब्राव्होला १२ धावांवर कुमार कार्तिकेयने बाद केले. अंबाती रायडू आणि शिवम दुबेला प्रत्येकी १० धावांवर रिले मेरेडीथने बाद केले. इतर फलंदाजांना स्वतःच्या नावासमोर दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे चेन्नईचा संपूर्ण संघ १६ व्या षटकातच केवळ ९७ धावांमध्ये परतला. डनियल सॅम्सने १६/३, कुमार कार्तिकेयने २२/२, रिले मेरेडीथने २७/२, जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

मुंबई इंडीयन्स किती षटकांमध्ये हा सामना जिंकणार ह्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. पण पहिल्या पाच षटकांत ३३/४ अशी मुंबई संघांची अवस्था झाली. कर्णधार रोहित शर्माला १८ धावांवर सिमरजीत सिंगने बाद केले. तिलक वर्मा आणि हृतिक शौकीन यांची भागीदारी चांगली जमलेली असताना मोईन अलीने हृतिक शौकीनचा १८ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. त्याच्या जागी आलेल्या टीम डेव्हिडने दोन षटकारांच्या अवघ्या ७ चेंडूंच्या सहाय्याने नाबाद १६ धावा काढल्या. सामन्याच्या शेवटच्या षटकात टीम डेव्हिडने मोईन अलीच्या पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारले आणि मुंबईचा विजय साकारला. तिलक वर्माने ४ चौकारांसह नाबाद ३४ धावा काढल्या. मुंबई इंडीयन्सने १४.५ षटकांत १०३/५ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. मुकेश चौधरीने २३/३, सिमरजीत सिंग आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मुंबईच्या विजयामुळे किंवा चेन्नईच्या पराभवामुळे अव्वल चार संघाना काहीच फरक पडला नाही.
डनियल सॅम्सला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने गोलंदाजी करताना केवळ १६ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते.
उद्याचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. बेंगळुरू परतीचा सामना जिंकून तिसर्‍या स्थानावर झेप घेण्याचा प्रयत्न करेल.

टीम झुंजार