झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या ३४८ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३७ हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील ७ गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. लाकडी निंबोळी ही योजना या परिसरासाठी महत्त्वाची आहे. ही योजना ३० वर्षापासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मंत्री भरणे यांच्या माध्यमातून सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार, जलसंपदामंत्री मा.ना. जयंतराव पाटील, लोकप्रिय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहेत.
या योजनेची सुरुवात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून आहे.
सदर योजनेसाठी आवश्यक ०.९० अघफू पाणी भीमा उजनी धरणाचा जलाशया मधून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मी. व दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुक्रमे ५१.२० मी. व ७३.२० शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील १० गावातील ४३३७ हेक्टर व बारामती तालुक्यातील ७ गावातील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण क्षेत्र सिंचनाखाली आणणे नियोजित आहे.
या प्रस्तावित योजनेच्या लाभ क्षेत्राच्या उत्तर बाजूस नवीन मुठा उजवा कालव्याचे तर दक्षिण बाजूस निरा डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र आहे. प्रस्तावित योजनेद्वारे या दोन्ही कालव्याच्या मधील सिंचनापासून वंचित असणाऱ्या क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे.