Viral Video: रुळावर धावत्या ट्रेनची धडक बसल्याने अपघात झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. अनेकवेळा रेल्वे अपघातात प्राणीही बळी पडतात. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो लोकांची मनं जिंकत आहे. अचानक रेल्वे रुळावर ट्रेन जात असताना हत्ती आला. यावेळी लोको पायलटने जे केलं त्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी जंगलं कमी होत आहेत. अशा परिस्थितीत मानवी वसाहतींच्या विस्तारानंतर जंगलं कमी होऊ लागली आहेत. याचा थेट परिणाम वन्य प्राण्यांच्या जीवनावर होत आहे. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रेल्वे ट्रॅक जंगलातून जातो. पण उत्तर बंगाल रेल्वेने असा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.
नक्की काय झालं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मोठा हत्ती रेल्वे रुळ ओलांडताना दिसत आहे. हत्तीचा जीव वाचवण्यासाठी ट्रेनच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावले. हत्ती रेल्वे रुळ ओलांडत असून ट्रेन त्याच्या जवळ येत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मात्र हत्तीला धडकण्यापूर्वी लोको पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले, त्यानंतर हत्तीने अगदी सहज ट्रॅक ओलांडला.
रेल्वे ट्रॅक ओलांडताना हत्तीचा हा व्हिडीओ उत्तर बंगालच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे, त्यात म्हटले आहे की, “१५७६७ अप एसजीयूजे-एपीडीजे इंटरसिटी एक्सप्रेसचे लोको पायलट आरआर कुमार आणि सहाय्यक लोको पायलट एस कुंडू यांना अचानक जंगलात दिसले. काल १७.३५ वाजता गुलमा-शिवोक दरम्यान KM 23/1 वर हत्तीने ट्रॅक ओलांडला आणि वन्यजीव वाचवण्यासाठी ट्रेनचा वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक लावला.”
नेटकर्याच्या प्रतीक्रीया….
लोको पायलटच्या हुशारी आणि सतर्कतेमुळे एका महाकाय जंगली हत्तीचे प्राण वाचले, जे पाहून लोक ट्रेन चालवण्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. हा व्हिडीओ १२ मे रोजी पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत २.५ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. एका ट्विटर युजरने ‘ड्रायव्हरला सॅल्यूट’ असं लिहिले, तर दुसऱ्याने त्याचे अभिनंदन केले आणि त्याला बक्षीस देण्याचे सांगितले.