मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा एकोणसत्तरावा सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबईने हा सामना ५ गडी ५ चेंडू राखून जिंकला. परतीच्या सामन्यात मुंबईने पराभवाची परतफेड केली. मुंबईचा ह्या मोसमातला शेवट गोड झाला तर तर दिल्लीचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे मनसुबे उध्वस्त झाले. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने १ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा जसप्रीत बुमराहने उध्वस्त केला.
कर्णधार ऋषभ पंतला ३९ धावांवर रमणदीप सिंगने बाद केले. पृथ्वी शॉला जसप्रीत बुमराहने बाद केले. अक्षर पटेल २ षटकारांसह १९ धावांवर नाबाद राहीला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स १५९/७ धावसंख्या गाठू शकली. जसप्रीत बुमराहने २५/३, रमणदीप सिंग २९/२, मयंक मार्कंडे आणि डॅनियल सॅम्स यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल मुंबईकडून यष्टिरक्षक ईशान किशनने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३५ चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्याला कुलदीप यादवने बाद केले. डिवाल्ड ब्रेविझने १ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ३७ धावा काढल्या. शार्दुल ठाकूरने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. टीम डेव्हिडने २ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ११ चेंडूंत ३४ धावा काढल्या. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. तिलक वर्माला २१ धावांवर अॅनरीच नोर्टजेने बाद केले. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात ५ धावांची गरज असताना खलील अहमदने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. पुढच्याच चेंडूवर रमणदीप सिंगने विजयी चौकार मारून दिल्लीचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न उध्वस्त केले. रमणदीप सिंगने नाबाद १३ धावा काढल्या. त्यामुळे मुंबईने १९.१ षटकांत १६०/५ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. शार्दुल ठाकूर, अॅनरीच नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन तर कुलदीप यादवने १ गडी बाद केला.
या सामन्याच्या निकालामुळे तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाचे दावेदार नक्की झाले. लखनौ सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा प्लेऑफचा सामना २५ मे रोजी कोलकत्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.
जसप्रीत बुमराहला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने २५ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते. साखळीचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.