टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा प्लेऑफचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने हा सामना ७ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने १२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५६ चेंडूंत ८९ धावा काढल्या. त्याला अल्झारी जोसेफने धावचीत केले.

अर्धशतक खात्यावर लागेपर्यंत संथगतीने खेळणारा बटलर अचानक वेगाने धावसंख्या वाढवू लागला. डावाच्या शेवटचा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला असताना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बटलर बाद झाला. कर्णधार संजू सॅमसनने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २६ चेंडूंत ४७ धावा काढल्या. त्याला रविश्रीनिवास साई किशोरने बाद केले. हार्दिक पांड्याने देवदत्त पडीकलचा २८ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. २०व्या षटकाच्या अखेरीस राजस्थान १८८/६ असे आव्हान उभे करू शकले.

प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सकडून शुभमन गीलने ३५ धावा काढल्या. त्याला देवदत्त पडीकलने धावचीत केले. मॅथ्यू वेडला ३५ धावांवर ओबेद मेकॉयने बाद केले. कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने १५व्या षटकात अर्धशतकी भागीदारी केली. १९व्या षटकात मिलरने एकेरी धाव घेत आपले अर्धशतक झळकावले. प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या षटकात मिलरने लागोपाठ ३ षटकार मारत सामना गुजरातच्या खिशात घातला आणि थेट टाटा आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचले.

सांघिक यश आणि खेळातले सातत्य गुजरात टायटन्सने दाखवले. त्यामुळेच त्यांना अंतिम फेरी गाठता आली.
डेव्हिड मिलरला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ३८ चेंडूंत नाबाद ६८ धावा काढल्या होत्या.
प्लेऑफचा दुसरा सामना उद्या लखनौ सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.

टीम झुंजार