मुंबई : – राज्यातील अनेक तरुण, तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. मैदानी चाचणी, लेखी परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत. परंतू राज्य सरकार तारखा कधी जाहीर करणार, पोलीस भरती प्रक्रिया कधीपासून राबविली जाणार आदी बाबत काहीही माहिती मिळत नव्हती.
राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज्यात ५०००० पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या १५ तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी १५ हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल.
पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले. नागरिक किंवा मुले गेम खेळण्यासाठी अनेक अॅपबेस्ड कंपन्यांकडून कर्ज काढतात. गरजेसाठी कर्ज काढले तर वेगळी गोष्ट, परंतू असे केल्याने फसवणुकीचे गुन्हे होत आहेत. सायबर क्राईम वाढत चालले असून पोलिसांवरील ताण वाढत आहे. यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज काढणे टाळावे. राज्य सरकार कारवाई करत आहे, परंतू सारे काही आपल्या हातात नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या घरांसाठी दरवर्षी ८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रकल्प हाती घेता येतील का याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस वसाहत किंवा स्व:ताचे घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे वळसे पाटील म्हणाले.