जळगाव :- खासगी कंपनीत गुंतवणूक करुन जास्त परतावा देण्याचे आमिष देत पिता-पुत्रांनी एका नोकरदारास 7 लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सोमवारी पहुर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव पंडीत पाटील (वय ३३, रा. मादणी, ता. जामनेर) यांची फसवणूक झाली आहे. पाटील पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. कराड जिल्ह्यातील येवती येथे राहणारे तानाजी गणपती शेवाळे व त्यांचा मुलगा नीलेश या दोघांनी काही लोकांच्या माध्यमातून पाटील यांच्याशी संपर्क साधला. सीन्टॅक टुल्स ॲण्ड कंम्पोनंट प्रा. लि. या कंपनीत व्यापार वाढवण्यासाठी पैशांची गुंतवणूक करा. त्यातून तुम्हाला जास्त परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी पाटील यांना दाखवले. वारंवार भेट घेऊन त्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार पाटील यांनी २१ मे २०१९ रोजी शेवाळे पिता-पुत्रांच्या बँक खात्यावर सात लाख रुपये पाठवले.
यानंतर पाटील यांनी वेळोवेळी पैसे परत मागीतले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पाटील यांनी पर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेवाळे पिता-पुत्रावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल किरण शिंपी तपास करीत आहेत.