मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील बैलगाडा शर्यतीची मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होती. या शर्यतीची चर्चा असण्याचं कारण म्हणजे दीड कोटींच्या बक्षिसांमुळे चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान, चिखली येथील या शर्यतींसाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे आमदार नितेश राणेही उपस्थित राहिलेले. या बैलगाडा शर्यती पाहून नितेश राणे यांनी एक खास घोषणा केली.
नितेश राणेंनी ट्विटरवरुन या स्पर्धेला उपस्थित राहिल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष महेश लंगडे यांना टॅग करत देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत एक घोषणा केली.
“ज्या वर्षी देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील त्यावर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल,” अशा कॅप्शनसहीत नितेश राणेंनी ट्विटरवरुन घोषणा केली आहे.
म्हणजेच यंदाच्या वर्षी ज्या स्पर्धेसाठी दीड कोटींची बक्षिसं ठेवण्यात आलेली, अशीच स्पर्धा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा केव्हा पहिल्यांदा भरवण्यात येईल तेव्हा कमीत कमी वेळात घाट सर करणाऱ्या बैलजोडीच्या मालकाला नितेश राणेंकडून मर्सिडिज-बेन्झ गाडी बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. मर्सिडिज-बेन्झ गाडीची किंमत भारतामध्ये ४१ लाख ९९ हजारांपासून सुरु होते.