जळगाव :- सध्या फसवणूक करणाऱ्याची संघ्यामध्ये वाढ होत आहे अश्यातच सोन्याची मोठी बाजारपेठ असलेल्या जळगाव शहरात एका कारागिराने सराफ व्यवसायिकाचे 14 लाख 11 हजार 649 रुपयांचे दागिने परत न करता फसवणूक केली आहे. मागील चार वर्षांत त्यांच्याच कारागिराकडून वेळोवेळी ही फसवणूक झाली असून, सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश भागवत भंगाळे (वय 31, रा. ओंकारनगर ) यांची फसवणूक झाली आहे. त्यांचे सुभाष चौकात भंगाळे गोल्ड नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानातील सोन्याच्या तुकड्यांपासून आकर्षक दागिने तयार करण्यासाठी अस्ता तारक रॉय (रा. मातोश्री बिल्डींग, शनिपेठ) हा कारागीर काम करीत होता. गेल्या चार वर्षात रॉय याने 273 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे तुकडे भंगाळे यांच्याकडून दागिने बणवण्यासाठी घेतले. परंतु, दागिने किंवा सोन्याचे तुकडे परत दिले नाहीत.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे कळाल्यानंतर भंगाळे यांनी दागिने मागितले. दागिने नाही तर सोन्याचे तुकडे परत करायला सांगितले. परंतु, रॉय याने काहीच परत केले नाही. अखेर सोमवारी भंगाळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.