झुंजार प्रतिनिधी । संतोष कदम.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते व पक्षाचे ज्येष्ठ नेते ना. जितेंद्र आव्हाड आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्या उपस्थितीत ‘कटिबद्धता राष्ट्रवादीची, अडीच वर्ष जनसेवेची’ या पुस्तिकेचे प्रकाशन काल मुंबईत करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी या संबंधीची माहिती दिली.
यावेळी ठाणे शहराध्यक्ष मा. आनंद परांजपे उपस्थित होते. अडीच वर्षांपूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. या अडीच वर्षात राज्य सरकारमधील पक्षाच्या प्रतिनिधींनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात पक्षाच्या वतीने करण्यात आलेली कामे तसेच गावपाड्यांपासून नगरपालिका व महानगरपालिकांपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली कामे या पुस्तिकेच्या माध्यमातून मांडण्याचे काम करण्यात आले आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी घेतलेला शिवभोजन थाळीचा निर्णय, मुंबईत तसेच राज्यात सामान्य माणसाला घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने घेतलेला निर्णय अशा अतिशय क्रांतिकारी निर्णयांसह सर्वच कामांची मांडणी या पुस्तिकेत करण्यात आली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान, राज्यसभेची निवडणूक उद्या, १० जून रोजी होत असल्याने वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून हा कार्यक्रम पुढील महिन्यात आयोजित करण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले.
‘कटिबद्धता राष्ट्रवादीची, अडीच वर्ष जनसेवेची’ ही पुस्तिका वाचण्यासाठी खालील लिन्कला क्लिक करा.