Rajyasabha Election Result 2022 : हे आहेत महाराष्ट्रातून निवडून गेलेले ६ राज्यसभा खासदार

Spread the love

मुंबई : – राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. भाजपला महाविकास आघाडीची ९ मतं मिळवण्यात यश आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे. 

भाजपचे संख्याबळ १२३  इतके झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे २८ मते राहत होती. मात्र, पीयूष गोयल यांना ४८ मते मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही ४८ मते मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ९ मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे ४१ मते घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले. तर सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आमदारांना फोडण्यात भाजपला यश

महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कुणाला किती मतं मिळाली?

संजय राऊत – 41

पीयूष गोयल – 48

अनिल बोंडे – 48

प्रफुल्ल पटेल – 43

इम्रान प्रतापगढी 44

धनंजय महाडिक – 41

संजय पवार – 33

सुहास कांदे यांचे मत बाद

भाजपने केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. तर यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या मताचे गणित बिघडल्याचे म्हटले जात आहे. 

टीम झुंजार