जळगाव :- घरी कौटुंबिक कलह सुरू असल्यामुळे एका प्रौढाची बहीण व आई त्यांची समजूत काढत होते. चर्चा झाल्यानंतर बहिणीला रिक्षा स्टॉपपर्यंत सोडण्यासाठी आई देखील घराबाहेर पडली. नेमक्या या पाच मिनिटात प्रौढाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी दुपारी 12.30 वाजता हरीविठ्ठलनगरात ही घटना उघडकीस आली. गणेश आत्माराम बडगुजर (वय 48) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ते एका गॅरेजवर काम करीत होते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वीच गणेश बडगुजर यांच्या लहान मुलीचे लग्न झाले आहे. या लग्नानंतर बडगुजर यांचे पत्नी प्रतिभा यांच्याशी वाद सुरू झाले. वाद विकोपाला जाऊन पती-पत्नी विभक्त राहू लागले होते. प्रतिभा ह्या मोठ्या मुलीकडे खोटेनगर परिसरात राहत होत्या.
तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. शनिवारी त्या मुलीसोबत घरी आल्या. यावेळी पती गणेश यांच्यासह सासू चंद्रकलाबाई व नणंद घरीच होत्या. यावेळी देखील सर्वांमध्ये भांडण झाले. घटस्फोट हवा असल्याचे प्रतिभा यांनी पतीस सांगितले. यावेळी पती गणेश यांनी काही दिवस सोबत राहण्याची विनंती त्यांना केली होती.
परंतु, रागाच्या भरात त्या निघून गेल्या. यानंतर गणेश यांची बहीण व आई यांनी त्यांची समजूत काढली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास बहिणीला रिक्षास्टॉपवर सोडण्यासाठी आई घराबाहेर पडल्या. यावेळी घरात एकटेच असलेल्या गणेश यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. काही मिनिटांतच त्यांच्या आई चंद्रकलाबाई घरी परतल्या असता त्यांना गणेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृश पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला.