जळगाव : – घरी न मागवता एखादी ऑर्डर आली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. पण असं वारंवार झालं तर धक्काच बसेल. असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बनावट ई-मेल आयडी तयार करून जामनेर इथल्या दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून महिलांची अंतर्वस्त्र मागविल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी स्वरूपातील मागवलेली ही अंतर्वस्त्र थेट दुकानदाराच्या घरीच येत असल्याने दुकानदार त्रस्त झाला असून त्याने अखेर याप्रकरणी सोमवारी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली तर यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२२ ते १३ जून २०२२ रोजीपर्यंत वेळोवेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानदाराच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून व स्वतःची ओळख लपवून दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर महिलांचे अंतर्वस्त्र ऑनलाईन ऑर्डर केले. तसेच सदरचे वस्तू कॅशऑन डिलिव्हरी मार्फत दुकानदाराच्या राहत्या पत्त्यावर पाठवले.
दुकानदाराने न मागवता घरपोच येणाऱ्या वस्तूंमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.