मुंबई:- मुबईतील दिंडोशी पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून १० तोळे सोनं जप्त केलं आहे. सोन्याचे दागिने असलेली पिशवी भिकाऱ्यानं कचऱ्यात फेकली. ती पिशवी घेऊन उंदिर इकडे तिकडे फिरत होता. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी उंदराचा पाठलाग करून सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. या दागिन्यांची किंमत जवळपास ५ लाख रुपये आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या सुंदरी (वय ४५ वर्षे) त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी घरात असलेले दागिने घेऊन बँकेत जायला निघाल्या. सुंदरी त्यांचे दागिने बँकेत तारण ठेवणार होत्या. बँकेत जात असताना सुंदरी यांना रस्त्यात एक भिकारी महिला आणि तिची मुलगी दिसली. सुंदरी यांनी त्यांच्याकडे असलेले काही वडापाव भिकारी महिलेला दिले. वडापाव एका पिशवीत होते.
थोड्याच वेळात सुंदरी बँकेत पोहोचल्या. आपण वडावाव असलेली पिशवी भिकारी महिलेला दिली, त्याच पिशवीत सोन्याचे दागिने होते, ही बाब त्यांच्या लक्षात आली. सुंदरी यांच्या पायाखालची जमीन सरकली. भिकारी महिला जिथे भेटली होती, ते ठिकाणी सुंदरी यांनी गाठलं. मात्र तिथे ती महिला नव्हतीच. त्यामुळे सुंदरी दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांनी भिकारी महिलेचा शोध सुरू केला.
दिंडोशी पोलीस ठाण्याचे अधिकारी एपीआय चंद्रकांत घारगे आणि सुरज राऊत यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यात भिकारी महिला गोरेगावच्या मोतीलाल नगरला गेल्याचं दिसलं. पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधला. वडापाव कोरडे असल्यानं ते कचऱ्यात फेकून दिल्याची माहिती या महिलेनं पोलिसांना दिली. पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवीचा शोध सुरू केला. मात्र त्यांना पिशवी सापडली नाही.
यानंतर पोलिसांनी पुन्हा परिसरातील सीसीटीव्ही तपासले. महिलेची दागिन्यांनी भरलेली पिशवी एका उंदराच्या ताब्यात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. उंदिर पिशवीत शिरून त्यात असलेला वडापाव खात होता आणि पिशवी घेऊन इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी पिशवीचा पाठलाग सुरू करताच उंदिर पिशवीसकट गटारात शिरला. त्यानंतर पोलिसही गटारात उतरले आणि त्यांनी पिशवी बाहेर काढली. त्यात दागिने सापडले.