जळगाव :- विमा कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमीष देवून विद्युत कॉलनीतील सेवानिवृत्ताची ६१ लाख ७९ हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. २०१७ मधील या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपास करत आठ संशयितांकडून आतापर्यंत २० लाख ३० हजार रुपये हस्तगत केले. दरम्यान, या सेवानिवृत्ताचे निधन झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या पत्नीला १३ लाखांची रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. पोलिसांनी भोळे कुटुंबीयांना ७ लाख ३० हजार रुपये यापूर्वीच दिले आहेत.
अशी केली फसवणूक
विद्युत कॉलनीतील सेवानिवृत्त टिकाराम भोळे यांना मोबाईलवर दिपिका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकर रेड्डी या नावाने संपर्क साधत आरोपींनी त्यांना विमा कंपनीत पैसे गुंतविण्याचे आमीष दिले. आरोपींनी कंपनीचे बनावट कागदपत्रे भोळे यांच्या राहत्या घरी पाठवले. पॅनकार्ड लिमिट वाढविणे, बँक कमीशन, ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवणे, अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेतले.
आरोपी दिल्ली, यूपीतील
जून २०२२ मध्ये जळगाव सायबर पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने अमीत सिंग, देवेंद्र प्रकाश सिंग (रा. शाहदरा, नॉर्थ ईस्ट दिल्ली), लखमीचंद कुमार ( रा. जोहरीपूर दिल्ली), दिपेशकुमार तारकेश्वर सिंग (रा. नवी दिल्ली), अमीत रामसिंग वर्मा (रा. नोयडा उत्तर प्रदेश), राजकुमार कल्याण सिंग उर्फ अनुराग शर्मा (रा. गाजियाबाद उत्तरप्रदेश), रवीकुमार यशपाल सिंग उर्फ कमलाकर रेड्डी (रा.उत्तर प्रदेश), सोनी कृष्णेंद्रकुमार यादव (रा. दिल्ली) यांना अटक केली होती. रिटा सहाणी (रा. दिल्ली) फरार आहे. पोलिसांनी फसवणुकीतील एकूण रक्कम २० लाख ३० हजार रुपये आरोपींकडून हस्तगत केले. त्यापैकी पोलिसांनी भोळे कुटुंबीयांना ७ लाख ३० हजार रुपये परत केले आहेत. शुक्रवारी १३ लाख रुपये देण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सायबरचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे उपस्थित होते. आरोपी अक्षय यादव (रा. दिल्ली) याच्या बँक खात्यातील १३ लाख ६२ हजार रुपये गोठवण्यात आले आहेत.