पूर्णा प्रतिनीधी/ कलीम ताडकळस ते पूर्णा रस्त्यावर असलेल्या पिंगळगड नदीवरील पुल उंची व रुंदी अभावी धोकादायक बनला आहे. त्यामुळे सदरील पुलाची उंची वाढवून रस्त्याच्या तुलनेत त्याचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे, पूर्णा-सिंगणापुर मार्गावर ताडकळस जवळच पिंगळगड नदीवर ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पुल अरुंद आहे. या शिवाय पुलाची उंची देखील नदीची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाच्या तुलनेत कमी आहे.
यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्याने सदरील पुल सहजरित्या नेहमीच पाण्याखाली जातो. यामुळे पूर्णा, नांदेड, हिंगोली त्याच प्रमाणे परभणी, सिंगणापूर मार्गावरील वाहतूकीस नेहमीच अडथळा निर्माण होतो. यामुळे ताडकळस व परिसरातील नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
काही महिन्यांपूर्वी सदरील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्णा ते ताडकळस दरम्यान पिंगळगड नदीवरील अरुंद पुलामुळे सदरील वाहतूक सुरळीतपणे होण्यात अडथळा निर्माण होत आहे. या शिवाय सदरील पुलाची संरक्षण पूरामुळे नाहीशी झाल्याने सदरील पुल धोकादायक बनला आहे.
वाहनांची वर्दळ असल्याने या पुलावर अपघाताच्याही घटना घडत आहेत. अशा स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या रुंदीकरण व उंची वाढवण्याकडे लक्ष देवून पुलाचे काम त्वरीत करावे, अशी मागणी पूर्णा तालुक्यातील ताडकळस, लिमला, खडाळा, फुलकळस, धानोरा, देऊळगाव, माखणी यासह इतर गावातील नागरीकांकडून होत आहे. दरम्यान, या मार्गावर नवीन रस्त्याचे काम झाल्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुल अरूंद असुन त्यावरील लोखंडी पोल सा. बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे नाहिसे झाले आहेत. त्यामुळे कधीही मोठा अपघात होउ शकतो.