जळगाव :- घराजवळ राहणाऱ्या एका मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचे काही मुलांनी अपहरण करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार शनिवार 18 जून रोजी गाडगेबाबा चौक परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सय्यद अकबर सय्यद सलाउद्दीन असे जखमी तरुणाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अकबर हा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबीयांच्या घराकडे वारंवार पाहत होता. याचा राग आल्यामुळे सोनु अढाळे, सुशांत कोळी, पप्पु आढळे, आकाश भालेराव यांनी अकबर याला दुचाकीवर बसून गाडगेबाबा चौकात आणले. तेथेन पठाण बाबा दर्ग्याकडील निर्जनस्थळी आणून त्याला मारहाण केली. ‘हमेशा मेरे घर की तरफ क्यु देखता है’ असे म्हणत चौघांनी काठ्यांनी अकबरला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी पठाण बाबा दर्ग्याकडे धाव घेत हा वाद मिटवला. जखमी अकबर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अकबर याने दिलेल्या तक्रारीवरुन चौघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.
तर दुसरा एक गुन्हा अकबरच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे. यात तो दोन जूनपासून वारंवार परिसरात राहणाऱ्या एका तरुणीकडे पाहून इशारे करत होता. शनिवारी सायंकाळी त्याने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन अकबरच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले हे पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.