राजकीय घडामोडींना वेग! उद्धव ठाकरेंनी बोलवली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक; ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या शिंदेंच्या उपस्थितीबद्दल संभ्रम

Spread the love

सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या निवडणुकीत मतं फुटल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून या पराभवाची चाचपणी सुरु झाली आहे. असं असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही.

अशातच आता उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक आणि शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते असणारे एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार सायंकाळपासूनच शिंदे आणि १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजल्यानंतर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनऐवजी बैठकीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित होते. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. (Shivsena in MLC Election 2022)

टीम झुंजार