उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडताच शिवसेनेला पुन्हा धक्का; अजून दोन आमदार फुटले

Spread the love

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत जवळपास ३९ आमदार घेऊन बंड पुकारले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली आणि त्यानंतर शिवसेनेचे पुन्हा दोन आमदार फुटल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधल्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल आले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सोडल्यावर शिवसेनाला बसलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. या दोन आमदारानंतर एकनाथ शिंदेंच्या गोटातील आमदारांची संख्या आता ४१ वर पोहोचली आहे


दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे शिवसेनेच्या गोटातून बाहेर पडले असून गुवाहटीला रवाना झाल्याची माहिती आहे. या दोन्ही आमदारांनी काल बंडखोर आमदारांवर टीका केली होती. शिवसेनेने विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड केली त्यावेळी हे दोन्ही आमदार उपस्थित होते. आणि आज मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना भावनिक साद घातल माझं काय चुकलं असा सवाल केला होता पण या दोघांनीही आता गुवाहटीचा रस्ता धरला आहे.

यासंदर्भातील माहिती खुद्द मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे. आज सकाळपर्यंत माझा विचार नव्हता पण काही कारणांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे असं ते म्हणाले आहेत. या दोन आमदारांच्या शिवसेनेतून शिंदेच्या गोटात जाण्याने शिनसेनेला मोठा धक्का बसला असून आता हळूहळू पक्षाला भगदाड पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीम झुंजार