चाळीसगाव :- सात वर्षीय अल्पवयीन मुलीस शेतात घेऊन जात अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी जन्मठेप व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गोरख उर्फ बापु भिमराव सोनवणे (भिल, वय 24, रा. बिलाखेड, ता. चाळीसगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घटना अशी की, 18 ऑक्टोबर 2020 रोजी गोरख याने ओळखीच्या असलेल्या सात वर्षीय मुलीस दुचाकीवर बसवून परिसरातील मेंढी फॉर्मजवळील शेतात नेले. यानंतर तीच्यावर अत्याचार केला आणि मारहाण केली. यानंतर पुन्हा तीला घरी सोडून दिले. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तीला त्रास होत असल्याचे तीच्या आईच्या लक्षात आले. पीडितेस विश्वासात घेऊन विचारले असता तीने गोरखने केलेला प्रकरणाची आपबीती कथन केली. यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गोरखच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो, अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जन्मठेपेची शिक्षा
दोषारोप दाखल केल्यानंतर न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात सरकारपक्षाने 9 साक्षीदार तपासले. यात पीडित मुलगी, फिर्यादी, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणीअंती न्यायालयात गोरख याला दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. निलेश चौधरी यांनी काम पाहिले.