पूर्णा/वार्ताहर:- गेल्या चोवीस तासात परभणी जिल्ह्यात ५३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून त्यामुळे एकूण १७१ व्यक्ती उपचार घेवू लागले आहेत.परभणी शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतो आहे.
शनिवारी (दि.०८) म्हणजे चोवीस तासात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५३ पर्यंत पोहोचला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत २९ रुग्ण चोवीस तासात आढळले होते. त्या तुलनेत रुग्णसंख्येतील वाढ निश्चितच लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरीकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावीपणे अंमल करणेच गरजेचे ठरले आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत शनिवारी दिलेल्या प्रेसनोटद्वारे गेल्या चोवीस तासात एकूण ५३ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. तर तीघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सद्यस्थितीत रुग्णालयात १७१ व्यक्ती उपचार घेत असून २४ तासात प्रशासनाद्वारे १ हजार २२८ नमूने तपासण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५१ हजार ६६९, आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० हजार १९९ एवढी असून आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार २९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात एकूण ५ लाख ७२ हजार १९ व्यक्ती निगेटीव्ह आढळून आल्या आहेत. १४१ नमूणे नाकारल्या गेले.