जळगावात एकनाथ शिंदेंविरोधात बॅनरबाजी: शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही ; जळगावातील शिवसैनिक संतप्त

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे अश्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना आमदारांना घेऊन बंडखोर एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथे ठाण मांडून बसलेले आहेत. राज्यातील सत्तानाट्याचा हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. शिंदे शिवसेना संघटनेवरच दावा करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यांच्याकडे असलेले आमदार हीच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही, असे फलक जळगावात लावण्यात आलेले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले आहेत. या आमदारांनी शिंदे गटातून परत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे परत यावे, अशी विनवनी आमदारांना करण्यात येत आहे. गुलाबराव पाटील यांचा पुतळा शिवसैनिकांकडून जाळण्यात आला.

शिंदे गटाकडून थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच दावा सांगण्याचा प्रयत्न होत असल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. बंडखोरांविरोधात वातावरण तयार झालेले आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बंडखोर शिंदे यांच्या विरोधात जळगावात फलक लावलेले आहेत. त्याला शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही, असे शीर्षक देण्यात आलेले आहे. दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो वरच्या बाजूला आहेत. त्याखाली बंडखोर शिंदे यांच्या शेजारी धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे प्रसाद ओक या दोघांचे फोटो आहेत. त्यामध्ये डुप्लीकेटांची नाही, असे लिहिलेले आहे. शहरभर हे फलक लावण्यात आलेले आहेत. बाळासाहेबांच्या निष्ठावान शिवसैनिकांना शिंदे यांचा थेट शिवसेनेवर दावा करण्याचा प्रयत्न रुचलेला नाही. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

टीम झुंजार