शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षात तर या बंडामुळे प्रचंड मोठा गोंधळ माजला आहे. रोज नवनवे आमदार-नेते हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळत असल्याचं समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुख यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं.
या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी अतिशय आक्रमक शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. जे गेले ते आपले कधीच नव्हते. बुडते ती निष्ठा, तरंगते ती विष्ठा, अशी ठाकरी शैलीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
तसंच “आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे… आता मी विठ्ठल आणि इतर बडवे… हीच गोष्ट पुढे आदित्यबद्दल करतील… म्हणजे स्वतःचा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काहीच नाही करायचे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कोव्हिडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे.
कोव्हिडचं लफडं संपतं न संपतं तर मानेचा त्रास सुरू झाला आणि आता हा त्रास येतो.
कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे.
मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही.
स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी यापदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता.
माझं मानेचं ऑपरेशन झालं तेव्हा मोदीही मला म्हणाले की ऑपरेशन केलं हे फार हिंमतीचं काम केलं..मी म्हटलं हिंमत माझ्या रक्तात आहे.
पहिलं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस सगळं ठीक होतं मात्र एक दिवस सकाळी उठल्यावर लक्षात आलं की माझ्या शरीराच्या काही भागांच्या हालचाली बंद पडतायत म्हणून दुसरं ऑपरेशन केलं.
त्याचा फायदा करून घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला..आदित्यही त्यावेळी परदेशात होता.
मला झोपेतही विचारलं की वर्षा की मातोश्री तर स्वप्नातही सांगेन की मातोश्री.
काही आमदार त्यादिवशी म्हणाले की कापलं तरी मी तिकडे जाणार नाही, मात्र गेले..आता कापून काय करू..जाऊ द्या
फंड मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या.. मी तर सगळ्या पातळीवर फंड वाटपाचं काम करत आलो आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाचं मंत्रीपद दिलं
(एकनाथ शिंदेंबद्दल)..असं मंत्रीपद जे इतर खात्यांना पैसे देतो.
बाळासाहेबांची शिवसेना संपली आहे असं लोक म्हणतात..ही समोर बसली आहे ती बाळासाहेबांचीच शिवसेना आहे.
महत्वाकांक्षा असावी मात्र ती अशी नसावी की ज्यानं दिलं त्याला खावं.
तुम्हाला आमदार घेऊन जायचंय तर घेऊन जा, किती न्यायचे तेवढे न्या..मात्र जोवर बाळासाहेबांनी रूजवलेली मूळं आहेत तोवर शिवसेनेला काहीच होणार नाही.
जे सोडून गेले ते माझे कधी नव्हतेच..आणि ते सोडायला मला वाईट वाटत नाही..
सेनेची मुळं माझ्यासोबत आहेत.
ज्यांना आपण मोठे केले, त्यांची स्वप्न मोठी झाली..ती स्वप्न मी पुरी करू शकत नाही..त्यांनी जावं..मला बाळासाहेबांनी ते शिकवलं नाही.
आपण भाजपसोबत जायला पाहिजे असा काही आमदारांचा माझ्यावर दबाव आहे..
माझ्या कुटुंबियांवर, मातोश्रीवर घाणेरड्या आरोप करणाऱ्यांसाठी मी शांत बसणार नाही..त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही..मी शांत आहे षंढ नाही.
कधी राणेंना आपल्यावर सोडा, कधी तोतड्याला अंगावर सोडा..असे भाडोत्री लोकांना वापरून सोडून द्यायचे अशी त्यांची भूमिका आहे हे विसरून चालणार नाही.
आपण प्रत्येकवेळी त्यांना(शिंदेना) महत्वाची खाती दिली..नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे होते..मात्र हे त्यांना दिलं..
संजय राठोडचं वनखातं मी माझ्याकडे घेतलं..अत्यंत साधी खाती मी माझ्याकडे ठेवली आणि इतर खाती मी वाटून टाकली.
मला तरीही या आरोपांचा वीट आलाय…आणि ही वीट ठेवून चालणार नाही तर अशा लोकांच्या डोक्यावर मी हाणणार आहे.
आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे..आता मी विठ्ठल आणि इतर बडवे..
हीच गोष्ट पुढे आदित्य बद्दल करतील.
.म्हणजे स्वतःचा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काहीच नाही करायचे का
आपल्या माथी अनेकदा पराभव आलाय..त्याने फऱक पडत नाही..
शिवाजी महाराजांच्या काळातही निवडणुका होत नव्हत्या..लढाईनंतर गावं बेचिराख व्हायची मात्र जनता शिवाजी महाराजांसोबत राहिली.
म्हणजे हारजीत ही मनावर अवलंबून असते..हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते.
बुडते ती निष्ठा, तरंगते ती विष्ठा…ही माझ्यासोबत सेनेत बुडेल ती माझी निष्ठावंत सेना आहे.
जो कुणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवीन अन्यथा मला काही करायचे नाही.
पहिला शिवसेनेचा नारळ फुटला होता तशी परिस्थिती आता आहे असे समजा आणि माझ्यासोबत उभे राहा.
तुम्हाला तुमचं भवितव्य तिथे दिसत असेल तर तुम्ही तिथे खुशाल जा मी अडवणार नाही..
तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगा मी हे पद आनंदाने सोडायला तयार आहे (लोकांनी नारेबाजी केली की आम्ही तुमच्या सोबत आहे)
तुम्हाला वाटत असेल की मी शिवसेना चालवायला नालायक असेल तर मागचा फोटो काढून टाका, आणि विसरून जा मी बाळासाहेबांचा मुलगा आहे..
सेना पुढे न्यायला तुमही समर्थ आहात.