पाचोरा :- हनुमंतखेडा सह परिसरात आज दि. २४ जुन रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. दरम्यान हनुमंतखेडा येथील २० वर्षीय युवक शेतात काम करत असतांना अचानक विज पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
हनुमंतखेडा ता. सावखेडा ( सोयगाव जि.औरगांबाद येथे आज दि. २४ जुन रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. दरम्यान येथील रहिवाशी किशोर परशराम पवार (वय २०) हे त्यांचे शेतात कपाशी पिकास सऱ्या पाडण्याचे काम करत होते. मूसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांनी शेजारील सिसम झाडाचा सहारा घेत झाडाखाली किशोर पवार, त्यांचे काका व चुलत भाऊ थांबले होते. काही वेळ थांबल्यानंतर काका व चुलत भाऊ काही अंतरावर गेले.
दरम्यान क्षणातच जोरात आवाज झाला. व सिसम झाडावर (ज्याठिकाणी किशोर पवार हे थांबले होते) विज पडताच किशोर पवार हे धाराशाही झाले. काही अंतरावर गेलेले काका व चुलत भाऊ यांचा सुदैवाने जीव वाचला. मात्र किशोर पवार हे निपचित पडलेले असुन त्यांनी परिधान केलेले कपडे देखील फाटले होते. किशोर पवार यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी किशोर पवार यास मृत घोषित केले.
मयत किशोर परशराम पवार याचे पश्चात्य आई, वडिल, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने सोयगाव पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे. किशोर पवार याचे अकस्मात मृत्यूने हनुमंतखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.