Maharashtra Politics Crisis : राज्यात सध्या राजकीय घटनांनी वातावरण गढूळ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता मैदानात उतरले असून बंडोखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला आहे.
मुंबई :- उद्धव ठाकरेंनी . महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत. महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार असल्याचा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय. आम्हाला उद्धव ठाकरेंबाबत नितांत आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. जनमताच्या कौलाप्रमाणं राज्य युती सरकार हवं होतं, पण तसं झालं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
केसरकर पुढं म्हणाले, उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीतील काहीजण सल्लागार आहेत. ठाकरेंना राष्ट्रवादीतील () सल्लागार महत्वाचे वाटतात. आधी मार्ग काढला असता, तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सध्या 10-12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं जातोय. आमच्यावर गद्दाराचेही आरोप करण्यात आले आहेत. हे कितपत योग्य आहे? असा सवाल करुन ते म्हणाले, बाहेर पडणाऱ्यांची समजूत काढण्याची पध्दत आहे. मात्र, इथं समजूत काढण्याची धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळं ठाकरेंनी काॅंग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडावी, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.