महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या केंद्रस्थानी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नवनवीन डावपेचांना सुरुवात केली आहे. शिंदे अनेक दिवसांपासून गुवाहाटीत आमदारांसोबत आहेत. दीपक केसरकर बंडखोर आमदारांची बाजू विविध माध्यमांसमोर मांडत आहेत. मात्र आज अचानक शिंदे माध्यमांसमोर आले. ते काही आमदारांसोबत रॅडिसन ब्लू हॉटेलच्या आवारात उतरले. मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेल्या माध्यमकर्मींना त्यांनी आमदारांबद्दल माहिती दिली.
यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोलताना थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. याला शिंदेंनी हॉटेलच्या आवारातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
मागील सात दिवसांपासून राज्यातील सत्तानाट्यात खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे गटाने शिवसेना आमची असल्याचं सांगितलं. अद्याप ते माघार घ्यायलाही तयार नाहीत. त्यातच फडणवीस तिसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले असून जेपी नड्डा आणि अमित शाहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. याच दरम्यान शिंदे मागील सात दिवसांनंतप पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी कोण आमदार संपर्कात आहेत हे सांगावं. नावं सांगा, असं शिंदे म्हणाले.
आमदार तुमच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, सर्व ५० आमदार या ठिकाणी स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना कोणीही जबरदस्ती नाही केली. ते सुरक्षित आहेत. बाळासाहेबांची खरी शिवसेना हीच आहे, असं शिंदे म्हणाले.