गोळा, लिंबू-मिरची फेकून कुटुंबाला घाबरवले: जागा खाली करण्यासाठी शेजाऱ्याकडून जादूटोण्याचा प्रयोग.

Spread the love

जळगाव :- वकील कुटुंबीयांनी वडिलोपार्जित जागा न्यायालयातून लढा देत मिळवल्यानंतर शेजारच्यांना जागा सोडावी लागली. या द्वेषातून त्यांनी वकील कुटुंबीयांना भीती घालण्यासाठी जादूटोणा केला. अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी रक्त, कणकेचा गोळा, लिंबू-मिरची फेकून भीती घातली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर दालफड येथे अॅड. केदार भुसारी हे पत्नी अंजली व मुलगा कार्तिक सोबत राहतात. त्यांच्याच जागेत प्रकाश रामेश्वर व्यास, ललिता प्रकाश व्यास, सुशीला गोपाळ पंडित, विद्या गोपाळ पुरोहित हे ४५ वर्षांपासून राहतात. ही जागा भुसारी यांच्या आजोबांनी त्यांना राहण्यासाठी दिली.

न्यायालयात दाद मागितली :

यानंतर सन २००७ मध्ये रिकामी करण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. भुसारी यांनी न्यायालयात दाद मागितली. कामकाज होऊन सन २०१७ मध्ये जागेचा ताबा भुसारी यांना मिळाला. तेव्हापासून शेजारी त्यांचा द्वेष करीत आहेत. अशात ३० मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता भुसारी यांच्या गेटवर मानवी केस, हळद-कुंकू टाकले होते. त्याच रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कुणीतरी त्यांच्या दारावर दगड मारले. १४ जून रोजी अंजली भुसारी ह्या बाहेर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या तेव्हा कपड्यांवर रक्त टाकलेले दिसून आले.

गेटमध्ये कुणीतरी फेकले :

२८ जून रोजी दुपारी अंजली गेटमध्ये आल्या तेव्हा कणकेचा गोळा व त्यावर काळी बाहुली, हळद-कुंकू वाहिलेले, पिवळ्या अक्षरात अंजली असे लिहिलेले होते. काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या, लिंबू व त्यावर सुया टोचलेल्या होत्या. हे सर्व अंजली यांच्या समोर कुणीतरी फेकले. त्यामुळे अंजली प्रचंड घाबरल्या. यापूर्वी घडलेले सर्व प्रकारदेखील त्यांनी पती अॅड. केदार भुसारी यांना सांगितले होते. जागा रिकामी करण्यासाठी हे प्रकार शेजारी राहणाऱ्या पाच जणांकडून होत असल्याचा संशय त्यांना आहे.

प्रकार वाढल्याने शहर पोलिसात फिर्याद :

दरम्यान, हे प्रकार वाढत असल्यामुळे अखेर भुसारी दाम्पत्याने २८ रोजी रात्री शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार शेजारी राहणाऱ्या पाच जणांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड तपास करीत आहेत.

टीम झुंजार