राज्यात आणखी एक राजकीय भूकंप? अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे नाराज फडणवीसांच्या भेटीला…

Spread the love

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी रात्री नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटीमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर त्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले.

मात्र, नव्या सरकारची रचना सर्वांनाच चक्रावून टाकणारी ठरली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तर, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षादेशावरून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. ते पद स्वीकारण्यास फडणवीस तयार नव्हते, अशी चर्चा आहे.

त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी ती दडूनही राहिलेली नाही. अशात गुरूवारी सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीस यांची रात्री उशीरा मुंडे यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी मुंडे भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत.

त्याशिवाय, मुंडे यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिले जाते. शिवसेनेतील बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून पवार राजकीय पटलावर फारसे सक्रिय दिसले नाहीत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी फडणवीस आणि पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा प्रयत्न केला. पण, तो अयशस्वी ठरला. त्या सगळ्या बाबी विचारात घेता मुंडे यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

टीम झुंजार