शिवसेनेला भगदाड ? शिंदे गटाशी जुळवून घ्या नाहीतर १२ खासदार…

Spread the love

मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले मतभेद मिटवण्याची विनंती केली. त्यानंतर शिवसेनेचे किमान 12 लोकसभा खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. भाजपच्या एका नेत्याने आणि एका केंद्रीय मंत्र्याने असा दावा केला की शिवसेनेतील फुटीचा लोकसभा खासदारांवरही परिणाम होईल, आणि पक्षाच्या एकूण 19 पैकी किमान डझनभर खासदार वेगळा विचार करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाच्या दीर्घकालीन हितासाठी शिंदे यांच्या गटासोबत जुळवून घेण्याची सूचना केली. कारण शिंदे गटाचा परिणाम संपूर्ण पक्षावर पडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि राजन विचारे हे तीन खासदार या बैठकीला उपस्थित नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे लोकसभेत १९ आणि राज्यसभेत तीन खासदार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची ‘शिवसेना नेते’ पदावरून हकालपट्टी केली. एक दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप केला आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरची ही सर्वात मोठी कारवाई मनाली जात आहे.

शिंदे यांच्यासोबत सध्याचे किती खासदार जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर खासदार देखील मोठ्या पेचात आहेत. काही खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर हा शिवसेनेसाठी मोठा धक्का ठरेल ज्यातून सावरायला शिवसेनेला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागले.

टीम झुंजार