मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० च्या पहिल्या सामन्या प्रमाणेच दुसर्या सामन्यतही इंग्लंड संघाचा ४९ धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने गोलंदाजी स्वीकारली.
कर्णधार रोहित शर्माने झटपट ३ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावा केल्या. त्याला रिचर्ड ग्लिसनने जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. ऋषभ पंतने २६ धावा काढल्या. त्यालाही रिचर्ड ग्लिसनने जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. दीपक हुडाच्या जागी संघात परतलेल्या विराट कोहलीने निराशा केली. रिचर्ड ग्लिसनने त्याला झटपट बाद केले. कालच सौरभ गांगुलीने त्याला सलग १३ वर्ष सुट्टी न घेतल्याचा दाखला दिला होता. पण गांगुलीची तंदुरुस्ती आणि कोहलीची तंदुरुस्ती ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे.
खरंच कोहलीला विश्रांतीची गरज आहे. निवड समितीने खरंच ह्या मुद्दयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे. आज ख्रिस जॉर्डनचा दिवस होता. त्याने सूर्यकुमार यादव १५, हार्दिक पांड्या १२, हर्षल पटेल १३ आणि भुवनेश्वर कुमारला २ धावांवर बाद केले. दिनेश कार्तिकला १२ धावांवर हॅरी ब्रुकने धावचीत केले. रवींद्र जडेजाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत चौफेर फटकेबाजी केली. त्याने ५ चौकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत नाबाद ४६ धावा काढल्या. त्याच्यामुळे २०व्या षटकाच्या अखेरीस १७०/८ अशी मजल भारताने मारली.
इंग्लंडची सुरूवात डळमळीत झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. तर कर्णधार जोस बटलरला डावाच्या तिसर्या षटकात ४ धावांवर बाद केले. डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जसप्रित बुमराहने १५ धावांवर लियाम लिव्हिंगस्टोन बाद केले. तर हॅरी ब्रुकला ८ धावांवर यझुवेंद्र चहलने बाद केले. डेव्हिड मलान आणि आणि मोईन अली यांची जोडी जमतेय असं वाटत असतानाच यझुवेंद्र चहलने डेव्हिड मलानला १९ धावांवर बाद केले. मोईन अलीला ३५ धावांवर हार्दिक पांड्याने रोहित शर्माकडे झेल देण्यासाठी भाग पाडले. डेव्हिड विलीने सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने नाबाद ३३ धावा काढल्या. पण तळाच्या फलंदाजांकडून त्याला योग्य साथ न मिळाल्यामुळे इंग्लंडचा डाव १७ षटकांत १२१ धावांवर संपला.
भुवनेश्वर कुमारने १५ धावांमध्ये ३ गडी बाद केले आणि फलंदाजी करताना २ धावा काढल्या. त्यामुळे तोच सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. मालिकेचा तिसरा सामना उद्या रविवारी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.